वादळी वाऱ्यामुळे बेळगाव शहरातील हिंदवाडी भागात नारळाचे झाड विजेच्या तारांवर पडल्याने विजेचे चार खांब कोसळले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.नारळाचे झाड पडल्यावर विजेचे खांब कोसळल्याने मोठा आवाज झाला आणि नागरिक घाबरून घरातून बाहेर आले.झाड पडल्याने काही दुचाकी वाहनांची मोडतोड झाली आहे.झाड पडल्याने विजेचे खांब कोसळले त्यामुळे त्या भागातील विद्युत पुरवठा ठप्प झाला .
झाड पडल्याचे तेथील नागरिकांनी विद्युत पुरवठा कार्यालयाला कळवल्यावर कर्मचारी लगेच घटनास्थळी दाखल झाले.कर्मचाऱ्यांनी त्वरित पडलेले झाड काढण्यास प्रारंभ केला.वीज पुरवठा करणाऱ्या तारा आणि खांबही बाजूला करण्यात आले.या मार्गावर झाड पडले त्यावेळी रहदारी नव्हती अन्यथा मोठा अनर्थ झाला असता असे तेथील रहिवाशांनी सांगितले.