भारत नगरमध्ये पथदीप दिवसाही सुरूच
बेळगाव:
एकीकडे ऐन सणासुदीच्या कालावधीमध्ये विजेचा खेळ खंडोबा करण्यात येतो. दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा अचानक बंद करण्यात येतो. तर दुसरीकडे पथदीप भर दिवसाही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी भारत नगर शहापूर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेले पथदीप भर दिवसाही सुरूच होते. ही आजकालची घटना नाही तर सातत्याने घडणारी घटना आहे.
यावरून लाईनमन किती निष्काळजीपणे आपले कर्तव्य बजावतात हे दिसून येते. ज्या वेळेला म्हणजेच सणासुदीच्या वेळेला खऱ्या अर्थाने वीज पुरवठा सुरळीत राहणे गरजेचे असते अशा वेळेला अचानकपणे वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सध्या लग्नसराई आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहेत.
अशावेळी वीज पुरवठा अचानकपणे आणि त्यात विशेष करून रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. या उलट भर दिवसा सार्वजनिक पथदीप सुरूच राहत आहेत याकडे संबंधित खाते लक्ष देणार आहे का? असा सवाल नागरिकांतून विचारण्यात येत आहे.