बेळगावात श्री गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलीस व आरएएफचे पथसंचलन
बेळगाव : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी होत असते. त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी बेळगाव पोलिसांनी रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) सोबत शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन आयोजित केले.
यंदा बेळगाव शहरात सुमारे ३७८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली असून, शहरातील नागरिकांसोबतच परगावातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडक उपाययोजना करण्यात आली आहे.
पथसंचलनाची सुरुवात राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून झाली. त्यानंतर चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, शास्त्री चौक, दरबार गल्ली, खडेबाजार, जालगार गल्ली, खडक गल्ली मार्गे हे पथसंचलन पुढे सरकत अखेरीस मार्केट पोलीस ठाण्यासमोर सांगता झाली. डोक्यावर निळसर शिरस्त्राण व हातात शस्त्रं व लाठ्या घेतलेले आरएएफ जवानांचे शिस्तबद्ध संचलन नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरले.
शहरातील संवेदनशील भागात बंदोबस्त अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली.