कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमध्ये होणार असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 9 डिसेंबर रोजी कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.त्या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले .
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळावाबाबत माहिती देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.
सदर भेटीप्रसंगी माजी आमदार किणेकर व सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 9 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा उद्देश जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केला. तसेच महामेळाव्याचे आयोजन आणि त्यासाठीच्या परवानगी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
जिल्हाधिकारी रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की, बेळगावमध्ये येत्या 9 डिसेंबर 2024 रोजी कर्नाटक सरकारची हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र एकीकरणतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा घेत असून त्याची कल्पना आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. कर्नाटक सरकारने जेंव्हा 2006 पासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली, तेंव्हापासून त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले जात आहे.