प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या महारक्तदानाला शेकडो रक्तदात्यांचा प्रतिसाद
बेळगाव – देश विदेशात सामाजिक एकता, शांतता आणि विश्वबंधुत्वासाठी कार्यरत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव युनिट वतीने ब्रह्माकुमारी दादी प्रकाशमणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान बेळगावात सलग तीन दिवस महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या महा रक्तदान शिबिरात बेळगावातील शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीने देश-विदेशात सामाजिक एकता आणि शांततेतेचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी वतीने सामाजिक उन्नतीसाठी अध्यात्मिक कार्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही आयोजित केले जात असतात.रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांचे जीव गमावा लागत आहे. आजही रुग्णालयांमध्ये रक्तांची कमतरता भासत आहे. याकडे लक्ष देऊन प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीने बेळगावात तीन दिवस महा रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिर रेडक्रोस सोसायटी, जिल्हा रुग्णालय तसेच बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. तीन दिवस चाललेले महा रक्तदान शिबिरात बेळगाव शहरातील शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य बजावले.
बेळगावात दिनांक 22 रोजी लक्ष्मी नगर प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटर, दिनांक 23 शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तर आज रविवारी शहापूर कंकणवाडी आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदाते तसेच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
महा रक्तदान शिबिराच्या सांगता समारंभाला, कंकणवाडी आयुर्वेदिक रुग्णालयाचे प्राचार्य सुहास शेट्टी,बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील,उपाध्यक्ष सचिन रंगरेज केएलई ब्लड बँकेचे प्रमुख अशोक अलतगी, जीवन जोशी, शेख होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डिसूजा, डॉक्टर संगीता बेळगावीमठ, जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर श्रीदेवी, डॉक्टर सुजाता गावकर, ब्रह्माकुमार महांतेश हिरेमठ, ब्रह्माकुमारी अन्नपूर्णा,ब्रह्माकुमार काशिनाथ भाई,ब्रह्माकुमारी शोभा, ब्रह्माकुमार दत्तात्रय भाई, ब्रह्माकुमार श्रीकांत भाई, सचिन पवार, हिरालाल चव्हाण,पी.जी. घाडी, श्रीकांत काकतीकर यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर तसेच रक्तदाते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या रक्तदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले.