मुसळधार पावसामुळे बेळारी नाल्याचे पाणी पात्राबाहेर पडून शेकडो एकरातील भात पीक पाण्याखाली गेले असून कडोली येथील तलाव फुटल्याने शेतात पाणी पसरून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले.दूधगंगा, वेदगंगा आणि कृष्णा नदीला पूर आल्याने निपाणी, चिकोडी,अथणी आणि कागवाड तालुक्यातील ८२९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सुक्षेत्र येडुर येथील विरभद्रेश्र्वर मंदिरात पाणी आले आहे. बडकुंद्री येथील होळेवा देवीच्या मंदिराला देखील पाण्याने वेढले आहे.मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील ४१ पूल पाण्याखाली गेले आहेत.पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील आठ हजार एकर पेक्षा अधिक जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे.
चिकोडी तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा,दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांना पूर आला असून अंकली येथील कृष्णा नदीवरील मांजरी पूल पाण्याखाली गेला आहे.चिकोडी तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे.
नद्यांचे पाणी पात्राबाहेर वाहत असल्याने नदी काठावरील शेतात नद्यांचे पाणी पसरल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.चिकोडी तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले असून पोलिसांनी तेथे बॅरिकेड्स लावून बंदोबस्त ठेवला आहे.नद्यांचे पाणी गावात शिरल्याने अनेक कुटुंबांनी आपल्या जनावरांच्या सह सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे.