“महिला पत्रकारांचा अपमान; आमदार देशपांडे यांच्यावर भाजप महिला मोर्चाची टीका”
बेळगाव :
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी महिला पत्रकार राधा हिरेगौडर यांच्या विचारलेल्या प्रश्नाला दिलेले अवमानकारक उत्तर सध्या वादग्रस्त ठरत आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत भाजप महिला मोर्चाच्या राज्य चिटणीस डॉ. सोनाली सरनोबत यांनी देशपांडे यांच्याकडून तातडीने सार्वजनिक माफीची मागणी केली आहे.
डॉ. सरनोबत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, महिला पत्रकारांनी “उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रसूती रुग्णालय कधी उभारले जाणार?” असा आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. मात्र, त्यावर देशपांडे यांनी केलेली “तुझी प्रसूती झाल्यावर उभारतो” अशी प्रतिक्रिया ही केवळ महिलांचा अपमान नसून, नीच राजकारणाचे दर्शन घडवणारी आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ नेत्याकडून सौजन्यपूर्ण आणि जबाबदारीची भूमिका अपेक्षित असते. पण, देशपांडे यांच्या वक्तव्यामुळे महिलांविषयी असलेला काँग्रेसचा दृष्टीकोन उघडकीस आला आहे.
डॉ. सरनोबत यांनी इशारा दिला की, जर देशपांडे यांनी पत्रकार राधा हिरेगौडर आणि महिला समाजाची माफी मागितली नाही, तर भाजप महिला मोर्चा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.