गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पूजा साहित्य आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बेळगावातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती.सकाळपासून फळे,फुले आणि सजावट साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी विक्रीला प्रारंभ केला होता.पूजेसाठी लागणाऱ्या पाच फळांची विक्री शंभर रुपयांपासून दोनशे रुपयापर्यंत करण्यात येत होती.मागणी वाढल्यामुळे फुलांच्या किमतीत देखील फुल विक्रेत्यांनी वाढ केली होती.पूजेसाठी वापरण्यात येणारे शहाळ्याचे नारळ पन्नास रुपयांना विकण्यात येत होते.
लहान आकाराच्या गुलाबांची दहा रुपयांना पाच प्रमाणे विक्री करण्यात येत होती.मोगरा,अबोली आणि शेवंतीच्या फुलांच्या माळाची देखील चढ्या भावाने विक्री करण्यात येत होती.गणपत गल्ली आणि बाजारपेठेत लोकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती.वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी चार चाकी वाहनाना प्रवेश बंदी करण्यात आली होती.पावसात देखील लोकांचा खरेदीचा उत्साह कायम होता.