कला फिल्म प्रोडक्शनच्यावतीने ऐतिहासिक चित्रपट
स्थानिक कलाकारांना संधी
बेळगाव:
कला फिल्म प्रोडक्शनच्यावतीने राजा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि बेळवडी मल्लम्मा सावित्री यांच्या जीवनावर आधारित हे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यात येणार आहेत. मराठी तसेच कन्नड भाषेमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे चित्रकरण बेळगाव , खानापूर , चंदगड तालुक्यामध्ये होणार असून स्थानिक कलाकारांना या चित्रपटांमध्ये संधी देण्यात येणार असल्याची माहिती कला फिल्म प्रोडक्शनचे संस्थापक व निर्माते प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवारी पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी चित्रपट कलाकार शांता आचार्य, चित्रपट निर्माते स्पर्श पाटील तसेच कला फिल्म प्रोडक्शनचा अन्य स्टाफ उपस्थित होता.https://dmedia24.com/organizing-the-anniversary-of-the-brahmaling-devasthan-at-chalwenheti/
या ऐतिहासिक चित्रपटाबाबत माहिती देताना प्रशांत पाटील म्हणाले, हे ऐतिहासिक चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये चित्रीकरण करण्यात येणार आहे. चित्रपटांच्या चित्रीकरणाला जानेवारी 2026 मध्ये सुरुवात होईल. जुलै, ऑगस्ट 2026 च्या दरम्यान चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. बेळगाव आणि परिसरामध्ये अनेक प्रतिभावान कलाकार आहेत. अशा प्रतिभावान कलाकारांची निवड करून त्यांना या चित्रपटांमध्ये संधी देणे हा आमचा उद्देश आहे.
कलाकाराच्या योग्यतेनुसार भूमिका त्यांना देण्यात येणार आहेत. बेळगाव आणि परिसरामध्ये असंख्य शिवभक्त आणि शिवकन्या आहेत. जे लाठीमेळा, तलवारबाजी, घोडेसवारी, मर्दानी खेळ अशा सर्व बाबतीत सक्षम आहेत. अशा प्रतिभावान कलाकारांची निवड करून त्यांना योग्य ती भूमिका देण्यात येणार आहे. या चित्रपटाला दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शक , संगीतकार , निर्माता अवधूत गुप्ते हे असणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटांना जिओ स्टुडिओ आणि झी स्टुडिओ तसेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांचे सहकार्य लाभले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता महेश चाबुकस्वार हे आहेत.
चित्रपट निर्माण करण्यासाठी अंदाजे 9 ते 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चित्रपट बनवताना योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. कोणतीही चुकीची माहिती दाखवण्यात येणार नाही याची दक्षतेने काळजी घेतली जाणार आहे. हे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यासाठी किमान दोन वर्ष त्याचे संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट बनवताना योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बेळगाव तसेच चंदगड तालुक्यातील विविध ठिकाणांची चित्रीकरणासाठी पाहणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव आणि परिसरातील शिवप्रेमींना येत्या काळामध्ये श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि बेळवडी मल्लम्मा सावित्री यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट पाहण्यास मिळणार आहे.