हिरबागेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई – दोन सराईत चोरटे जेरबंद, सात दुचाकी जप्त
बेळगाव : शहरात वाढत्या मोटारसायकल चोरी प्रकरणांवर लगाम लावण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. या पार्श्वभूमीवर हिरबागेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ₹4 लाख 10 हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत
1️⃣ संतोष शिवप्प उर्फ शिवानंद बेविनकोप्प (30), रा. इंचल, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव
2️⃣ राजू निंगप्प पाटील (32), रा. लक्ष्मी मंदिरजवळ, खानापूर, जुना कॅम्प, बेळगाव
या दोघांकडून चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो एचएफ डिलक्स, हिरो होंडा सीबीझेड अशा विविध मॉडेलच्या सात मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. या चोरीच्या गाड्यांचा संबंध हिरबागेवाडी, शाहापूर, मालमारुती, जुने हुब्बळी व सौंदत्ती पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यांशी असल्याचे समोर आले आहे.
या कारवाईत पीआय एस.के. होलेन्नवर, पीएसआय अविनाश यरगोप्प, पीएसआय बी.के. मिटगर, एएसआय आर.आय. सनदी तसेच एम.आय. तुरमरी, अक्षयकुमार नाईक, प्रभाकर भूषी, आर.एस. केळगिनमनी या पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या या यशस्वी कामगिरीचे पोलिस आयुक्त व डीसीपी बेळगाव यांनी कौतुक केले आहे.