“भाऊराव काकतकर महाविद्यालयात जिमखाना व भिंतीपत्रकाचा उत्साहात शुभारंभ”
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर महाविद्यालयात जिमखाना व भिंतीपत्रकाचा उद्घाटन सोहळा २२ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी सानिया पाटील व सहकाऱ्यांच्या मंगलगायनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख आणि स्टाफ सचिव डॉ. एस. एस. पाटील यांनी केले.
जिमखान्याचे उद्घाटन मुख्य अतिथी डॉ. विनोद गायकवाड (निवृत्त अधिष्ठाता, मानवविद्या, आरसीयू विद्यापीठ, बेळगाव) यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बॅज वितरण झाले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सर्जनशीलता, सकारात्मकता आणि व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात समान प्रावीण्य मिळवून सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन केले.
आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी रिया मरगाळे यांनी मानले. सूत्रसंचालन आर्थिक गोरं व रजिया सनदी यांनी केले.
या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोबतच सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन मिळून नव्या उंची गाठता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.