बेळगाव: देशभरात 83 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याचा निश्चिय करा ! – श्री. हर्षद खानविलकर
ज्याप्रमाणे रात्रीनंतर होणारा सूर्याेदय कुणी रोखू शकत नाही, त्याप्रमाणे कालमहिम्यानुसार होणारी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापनाही कुणी रोखू शकत नाही. हिंदु राष्ट्र येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अनेक संतांनीही त्याविषयी सांगून ठेवले आहे. काळही त्याच दिशेने जात आहे. त्यामुळे या काळात आपण जर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य केले, तर काळानुसार धर्मकार्य होऊन त्यातून आपली साधना होणार आहे. त्यामुळे यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याचा निश्चिय करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी या वेळी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. देवाज्ञ ब्राह्मण मंगल कार्यालय, शहापूर, बेळगाव याठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच देशभरात 83 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
इस्कॉनचे श्री. संजीव जाधव (श्री. सुदर्शन दास) यांनी मार्गदर्शन करताना संस्कृती आणि धर्माचरण सोडल्यामुळे समाजाची झालेले सद्य स्थिती स्पष्ट करून, मनुष्य जीवनातील गुरू व साधना महत्व सांगितले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला सनातनचे संत पूजनीय विजया दिक्षित यांची वंदनीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह 300 हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.