जीएसएस कॉलेजच्या स्वायत्तता पहिल्या सेमिस्टरचा निकाल
बेळगाव:
जीएसएस कॉलेजला स्वायत्तता मिळाल्यानंतर बीएससी आणि बीसीए अभ्यासक्रमांतर्गत पहिल्या सेमिस्टर ची परीक्षा 15 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा घेताना युजीसी ने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. ज्यामध्ये अंतर्गत तपासणी आणि बाह्य तपासणी अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
त्यानंतर त्याची सरासरी काढून विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहेत. या दोन्ही मूल्यमापनामध्ये 15% तफावत असलेल्या उत्तर पत्रिकांचे पुनरमूल्यांकन करून निकाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे , असे जीएसएस कॉलेजच्या परीक्षा समितीचे अध्यक्ष प्रा. नागसुरेश यांनी सांगितले. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
या परीक्षेची सुरुवात आणि निकाल ही सर्व प्रक्रिया चार आठवड्यात पूर्ण करण्यात आल्याचे कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. याच शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात 10 जानेवारीला करून पुढील सत्राची परीक्षा आणि निकाल याच पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला मानस असल्याचेही कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. जेणेकरून जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भारतातील अन्य विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा देणे आणि प्रवेश मिळवणे सोयीचे होणार असल्याचे जीएसएस कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी म्हटले आहे.
यावेळी माधुरी शानभाग , श्रीनाथ देशपांडे , प्रकाश शानभाग आदी उपस्थित होते.