एमईए संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा
बेळगाव, दिनांक 5 (प्रतिनिधी) : ” चांगला शिक्षक शिकवितो पण उत्कृष्ट गुरु प्रेरणा देतो आणि घडवितो. अशीच उत्कृष्ट गुरुची भूमिका एमईए या इंग्रजी संभाषण कौशल्य शिकविणाऱ्या संस्थेचे संचालक राजशेखर कोळीमठ पार पाडत असून त्यांनी आजतागायत तब्बल पन्नास हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण कौशल्याचे धडे देऊन घडविले आहे, ही प्रशंसनीय बाब असल्याचे लिंगराज महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका श्रद्धा पाटील म्हणाल्या.
मृणालिनी इंग्लिश अकॅडमी (एमईए) या संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा हिंदवाडी येथील आयएमईआर सभागृहात पार पाडण्यात आला. या कार्यक्रमात प्राध्यापिका शारदा पाटील बोलत होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रद्धा पाटील यासह मिस आशिया स्नेहल बिर्जे, उद्योजक चेतना सारंग, कृषी संशोधक आणि आर्ट ऑफ लिविंग चे डीन उदयकुमार कोळीमठ उपस्थित होते. एमईए संस्थेचे संस्थापक-संचालक राजशेखर कोळीमठ हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
इंग्रजीचा न्यूनगंड कदापि बाळगू नका. इंग्रजी भाषा व्यावसायिक दृष्ट्या, व्यावहारिक दृष्ट्या गरजेची आहे, याची जाणीव ठेवून ती भाषा आत्मसात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असे प्राध्यापिका श्रद्धा पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या.
इंग्रजी संभाषणाची जादू काही औरच आहे, हे ध्यानात घेऊन इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी अभ्यास करावा. कोणतीही भाषा आत्मसात करणे थोडे कठीण असले तरी मुश्किल मात्र अजिबात नाही, असे चेतना सारंग यावेळी बोलताना म्हणाल्या.
उदयकुमार कोळीमठ म्हणाले, गुरु-शिष्याचं नातं खूपच आगळ- वेगळं आणि घनिष्ठ असतं. खरा गुरू विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर तो सुदृढ आणि सशक्त समाज उभारणीसाठी हातभार लावणारा शिष्य घडवतो. राजशेखर कोळीमठ यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि गुणात्मक शिक्षण देत विश्वासार्हता जपली आहे. आज त्यांची संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.
कठोर परिश्रम आणि सातत्य यामुळेच व्यक्ती यशोशिखर गाठू शकते. आज इंग्रजी भाषा खूपच आवश्यक बनली आहे. यासाठी इंग्रजी भाषा अवगत करणे आज काळाची गरज आहे. कोणतेही ध्येय साध्य करायचे असेल तर प्रयत्न आणि संघर्ष महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवून कोणत्याही क्षेत्रात कार्यरत राहावे, असे स्नेहल बिर्जे यावेळी बोलताना म्हणाल्या.
प्रारंभी रिना जालगार यांनी स्वागत नृत्य केले. कोरा टेक्नॉलॉजीच्या प्रमुख कोमल कोळीमठ आणि सौरभ संगमन्नवर यांनी पाहुण्यांना व्यासपीठावर आणले. भाग्यश्री नाझरे, अभिजीत हंडे, तेजस्विनी सुळद, महेंद्र पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यानंतर राजशेखर कोळीमठ व कोमल कोळीमठ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राजशेखर कोळीमठ यांनी प्रास्ताविक भाषण केले. विद्यार्थी अभिषेक, प्रियांका, श्रुतिका आणि प्राची यांनी इंग्रजी संभाषण शिकतानाचे आपले अनुभव कथन केले.
एमईए आणि कोरा टेक्नॉलॉजीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आली. तसेच संस्थेच्या लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले.
एमईए संस्थेची उत्कृष्ट विद्यार्थिनी श्रद्धा कदम आणि कोरा टेक्नॉलॉजीचा उत्कृष्ट विद्यार्थी मनोहर लमानी यांना रोख पारितोषिक आणि ढाल देऊन सन्मानित करण्यात आले. पाहुण्यांचे हस्ते केक कापून संस्थेचे रौप्यमहोत्सव वर्ष साजरे करण्यात आले. संस्थेत सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यानंतर पाहुण्यांची भाषणे झाली.
शिवानी कामकर हिने आभार मानले तर प्राची कदम हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिश जामनानी, श्रीधर कामकर, अंजली आणि ग्रुप, सौरभ – समीना, अनुराधा, अमर आणि ग्रुप, ओमकार हरनी, तुकाराम आणि ग्रुप आदींनी यामध्ये भाग घेतला होता. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.