मामाच्या गावाला जाऊया!
उन्हाळी सुट्टीत मुलांचे नियोजन
बेळगाव:
सुट्टी म्हटले की मुलांचा आनंद गगनात मावत नाही. मग साहजिकच मामाच्या गावाला जाण्याची आठवण येते. तसे नियोजन देखील सुरू होते. सध्या शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. जवळपास दीड महिना विद्यार्थ्यांना सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुट्टीमध्ये मामाच्या गावाला जाण्याचे नियोजन केले आहे.
सुट्टी सुरू झाली की विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागतात. त्यामुळे काही मुले मामाच्या गावाला गेलेली आहेत तर काही मुले गावाला जाण्याच्या तयारीत आहेत. मामाच्या गावाला जायचे. खूप खूप मजा करायची असे त्यांचे नियोजन ठरलेले असते.’झुक झुक आगीनगाडी , पळती झाडे पाहूया’ मामाच्या गावाला जाऊया! असे म्हटलेच आहे.
ज्या मुलांच्या मामाचा गाव ग्रामीण भागात आहे अशा मुलांचा उत्साह तर अत्यंत ओसांडून जात असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे त्यांना ग्रामीण भागातील रानमेवा खायला मिळणार आहे. त्याचबरोबर विहिरी , नदी, तलावामध्ये मनसोक्त पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ही मुले तयार आहेत. त्यामुळे ही मुले मामाच्या गावाला जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.