‘वैभव’ भारतीय क्रिकेटसाठी
वैभव ठरेल
बेळगाव (विशेष प्रतिनिधी)
राजस्थान येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलमध्ये 28 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यामध्ये खेळताना बिहारच्या अवघ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने तुफानी शतक ठोकले आणि आपली गुणवत्ता दाखवून दिली. त्याने फक्त 35 चेंडूमध्ये शतक ठोकले आहे. टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात सर्वात कमी वयामध्ये जलद शतक करण्याचा मान त्याने स्वतःच्या नावे केला आहे. चेंडूला त्याने सातत्याने सीमारेषेपलीकडे धाडले. यावरून त्याच्या निडर खेळीचे दर्शन होते. यावरून वैभव हा येणाऱ्या काळामध्ये भारतीय क्रिकेटसाठी महान फलंदाज अर्थात फलंदाजीचे वैभव ठरेल यात शंका नाही. त्याने आयपीएल मधील पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आपली फलंदाजीची झलक दाखवून दिली होती..https://dmedia24.com/telling-the-summer-camp-of-balveer-vidyaniketan/
त्याची क्रिकेटसाठी असलेली जिद्द, सातत्य असामान्य आहे. क्रिकेटमध्ये उत्तुंग यश मिळवण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. त्याच्या खेळातील ही जिद्द पाहून त्याचे वडील संजीव यांनी स्वतःची जमीन विकून त्याला दहा वर्षाच्या असताना क्रिकेट प्रशिक्षणासाठी पटना येथे पाठवले होते. त्याच्या प्रशिक्षणामध्ये कुठलीच कमतरता राहू नये म्हणून त्याच्या वडिलांनी मोठे कष्ट घेतले आहेत. याची त्याला पूर्ण जाणीव असून जबाबदारीने आणि मेहनत करून वैभव यशाकडे वाटचाल करत आहे. त्याची क्रिकेटमधील मेहनत आणि प्रतिभा पाहून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे त्याला योग्य मार्गदर्शन करत आहेत.
सोमवारी झालेल्या आयपीएलच्या या सामन्यांमध्ये वैभवने आपल्या वादळी खेळीने आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या गोलंदाजांना धुतले. त्याच्या खेळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सामन्यात त्याने जवळपास डझनभर षटकार खेचले आहेत. आता यापुढील सामन्यांमध्ये वैभवला चेंडू कसा टाकायचा? याचीच भीती प्रत्येक गोलंदाजाला लागली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून बक्षीसाची घोषणा
वैभव याच्या खेळीवर प्रभावित होऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याला दहा लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांनी वैभव आणि त्याच्या वडिलांचे देखील विशेष अभिनंदन केले आहे. तसेच केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी देखील वैभव सूर्यवंशी यांचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. वैभवचे या वादळी खेळीबद्दल अभिनंदन होत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये तो भारतीय क्रिकेटसाठी वैभव नक्कीच प्राप्त करेल अशी अपेक्षा तमाम क्रिकेट प्रेमींना आहे.