चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या संशयितांना जामीन मंजूर
बेळगाव :
फायनान्स कंपनीचा कर्मचारी बँकेत रक्कम जमा करण्यासाठी जात असताना त्याला अडवून चाकूचा धाक दाखवत २९ हजार ७० रुपये व टॅब पळविणाऱ्या प्रकरणातील दोन संशयितांना सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
इराप्पा महादेव पावडी (मूळ हणंबरहट्टी, सध्या रा. वाल्मिकी गल्ली, उद्यमबाग, बेळगाव) आणि रामाप्पा उर्फ रमेश बाळाप्पा हल्लबण्णावर (मूळ सन्नकुंपी, सध्या रा. राजकट्टी, ता. हुक्केरी) अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.
ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता घडली होती. फिर्यादी राजू आडव्याप्पा शिवबसणावर (रा. बुदरकट्टी, ता. बैलहोंगल) हे फायनान्स कंपनीची रक्कम घेऊन बँकेत जमा करण्यासाठी जात असताना चार भामट्यांनी दोन दुचाकींवरून येऊन सन्नकुंपी-वन्नूर रोडवर त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून रोकड आणि टॅब हिसकावून नेण्यात आले. यावेळी सर्वांनी चेहऱ्यावर मास्क परिधान केला होता.
फिर्यादीने नेसरगी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर तपासादरम्यान या दोघांसह आणखी तीन जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सर्वांना १ ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते व त्यानंतर त्यांना कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
या दोघा संशयितांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीनंतर न्यायालयाने एक लाख रुपयांचे हमीपत्र, तितक्याच रकमेचा एक जामीनदार आणि ठराविक अटींसह जामीन मंजूर केला आहे.
त्यांच्या वतीने वकिली काम अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हनुमंत कनवी आणि अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी पाहिले.