शहापूर आचार्य गल्ली येथे विहिरीत पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले.आचार्य गल्ली येथील कुलकर्णी यांच्या घरातील विहिरीत पाचच्या सुमारास कुत्रा पडला.एका बाजूने विहीर उघडी असल्याने कुत्रा विहिरीत पडला.अमोघ कुलकर्णी यांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून कुत्रा विहिरीत पडल्याचे कळवले.अग्निशामक दलाचे अधिकारी कोरवी आणि कर्मचारी त्वरित आचार्य गल्लीत दाखल झाले.कर्मचाऱ्यांनी दोरी बांधून स्टीलचे मोठे ट्रे विहिरीत सोडले.
विहिरीत पडलेला कुत्रा स्टील ट्रे मध्ये बसत होता पण ट्रे वर ओढण्यास सुरुवात केल्यावर पुन्हा घाबरून विहिरीत उडी मारत होता.जिवाच्या आकांताने कुत्रा ओरडत होता.अखेर दोरी त्याच्या मागील पायात घालून घट्ट गाठ मारून त्याला विहिरीतून बाहेर काढले.कुत्र्याला सुखरूप बाहेर काढल्यावर जमलेल्या लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.