बेळगाव, प्रतिनिधी –
भारतीय हवामान विभागाने १९ आणि २० ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यास रेड अलर्ट जारी केला असून, सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील घटप्रभा, कृष्णा, दूधगंगा, हिरणाकाशी, मार्कंडेय व मलप्रभा नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
मंत्र्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिडकल जलाशय शंभर टक्के भरले असून दररोज हजारो क्युसेक पाणी आत येत आहे. सध्या २५ हजारांहून अधिक क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आले असून, हिरणाकाशी, मार्कंडेय व बळ्ळारी नाल्यामधून घटप्रभा नदीत तब्बल ४० हजार क्युसेक पाणी मिसळत असल्याने पुरस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
कृष्णा व हिरणाकाशी नद्यांनी धोक्याची मर्यादा ओलांडली असून, नदी पात्राजवळील शेतकरी व नागरिकांनी तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे. पूरस्थितीमुळे अनेक पूल पाण्याखाली गेले असून, वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थिती कायम राहिल्यास उद्याही सुट्टी दिली जाण्याची शक्यता मंत्र्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी विशेषतः मुलं, महिलावृद्धांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, आवश्यक साहित्य आधीपासून तयार ठेवावे व नदीकाठ तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, ते जिल्हा प्रशासन, पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकांशी सातत्याने संपर्कात आहेत. नागरिकांचे जीव वाचवणे हेच सरकारचे पहिले प्राधान्य असून, या संकटावर सर्वांनी जागरूकता व परस्पर सहकार्याने मात करावी, असे आवाहन त्यांनी केले.