आयपीएल महासंग्राम शनिवारपासून
केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात उद्घाटनाचा सामना
कोलकत्ता:
क्रिकेटचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलच्या महासंग्रामाची सुरुवात शनिवार 22 मार्च मार्चपासून होणार आहे. उद्घाटनाचा पहिला सामना शनिवारी सायंकाळी सात वाजता केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे.
भव्य दिव्य अशा उद्घाटन सोहळ्याने या महासंग्रामाची सुरुवात होणार आहे. सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिच्या सुमधुर गायनाने तर सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी हिच्या दिलखेच आदाने उद्घाटन समारंभामध्ये रंगत येणार आहे. त्याचबरोबर अन्य विविध कलाकार या कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर करून क्रिकेट शौकिनांना खुश करणार आहेत. यावेळी आयसीसी चेअरमन जय शहा यांच्यासह बीसीसीआयचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
अठरावे वर्ष
यावर्षीचे आयपीएलचे हे 18 वे वर्ष आहे. सदर स्पर्धेमध्ये एकंदरीत 10 संघ सहभागी होत आहेत. ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक संघ जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. जणू काही क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. यावर्षी लखनऊ सुपर जायंटस ने ऋषभ पंत याला 27 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे या वर्षाच्या आयपीएल मध्ये पाच टीमचे कर्णधार बदलले आहेत.