स्वातंत्र्यवीर हसमणीस पुरस्काराचे पहिले मानकरी: विनोद गायकवाड
बेळगाव -32 गाजलेल्या कादंबऱ्याचे लेखक, अनेक कथानी मराठी विश्व ढवळून काढणारे व ज्यांच्या कथानकांवर अनेक चित्रपट निर्माण करण्यात आले त्या ग्रामीण साहित्यिक द. का. हसमणीस यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या पहिल्याच “स्वातंत्र्यवीर द का हसमणीस वांग्मय पुरस्कारासाठी” बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांची निवड झाली आहे.
येत्या 9 फेब्रुवारी रोजी विटा येथे होणाऱ्या 43 व्या ग्रामीण साहित्य संमेलनात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र आणि महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. विनोद गायकवाड यांच्या आजवर 56 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून त्यांच्या ‘साई’ या कादंबरीचे कन्नड ,तमिळ, हिंदी ,इंग्रजी, गुजराती व कोकणी भाषेत अनुवाद झाले आहेत . गायकवाड यांचे अनेक कथासंग्रह, नाटके, समीक्षा वगैरे भरपूर लेखन प्रकाशित आहे .त्यांनी भीष्माच्या जीवनावर लिहिलेली’ युगांत’ ही कादंबरी हा मराठी वाङ्मयातील एक अनमोल ठेवा आहे. सीमा भागात मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी डॉ. गायकवाड नेहमी कार्यरत आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठातून मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ते अलीकडेच निवृत्त झाले आहेत.