सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे केला परत
बेळगाव:
हल्ली प्रामाणिकपणा खूपच कमी झाला आहे. असे असले तरीही प्रामाणिक माणसे आजही समाजात आहेत. याचाच अनुभव नुकताच आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की महिपाळगड येथील रहिवासी संभाजी केसरकर यांनी त्यांना सापडलेला मोबाईल फोन प्रामाणिकपणे गोंधळी गल्ली बेळगाव येथील रहिवासी सिद्धेश वटावकर यांना परत दिला आहे. संभाजी केसरकर हे केएलइ मध्ये नोकरी करतात . बुधवारी ड्युटी *संपल्यानंतर* संभाजी केसरकर हे घरी परत जात होते. तेव्हा त्यांना सुळगा हिंडलगा येथे रस्त्यावर पडलेला मोबाईल सापडला. त्यानंतर काही वेळाने सिद्धेश वटावकर यांनी मित्राच्या फोनवरून स्वतःच्या हरवलेल्या फोनवर कॉल केला. त्यावर संभाजी केसरकर यांनी तुमचा फोन मला सापडला आहे असे सांगितले.
तोपर्यंत संभाजी केसरकर हे शिनोळी पर्यंत पोहोचले होते. पण दुसऱ्याचा हरवलेला फोन वेळेमध्ये परत करण्यासाठी ते स्वतः परत शिनोळीहून कल्लेहोळ क्रॉस पर्यंत आले. तेथे येऊन त्यांनी सिद्धेश वटावकर यांना त्यांचा हरवलेला फोन परत दिला. संभाजी केसरकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सिद्धेश वटावकर यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. केसरकर यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.