सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानां अंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान
बेळगांव:छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र व ‘ऑपरेशन मदत’ यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील अतिदुर्गम भागात वसलेल्या सडा किल्ल्यावर स्वच्छ भारत अभियानां अंतर्गत दुर्गसंवर्धन व स्वच्छता अभियान राबविले.
या कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातून स्वयंसेवक आले होते.
महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, सिंधुदुर्ग येथून तसेच कर्नाटकातील चिकोडी, बेळगांव, खानापूर व हुक्केरी तालुक्यातील व गोव्यातील जवळपास 250/300 कार्यकर्त्यांनी दोन दिवस हजेरी लावली होती. सडा किल्ल्यावरील दुर्गसंवर्धन कार्यामध्ये महिला स्वयंसेवकानी व शाळकरी मुलां-मुलींनी मोठ्या उत्साहात भाग घेतलेला होता. त्याचं प्रमाणे एंजल फाउंडेशनच्या संस्थापिक व अध्यक्षा मीनाताई बेनके , यांच्यासोबत मिलन पवार शशिकला जोशी यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला.
रात्री संघटनेच्या मार्फत वेगवेगळ्या गडांची केलेली स्वच्छता व दुर्गसंवर्धनाच्या कार्याची माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थितांना दिली गेली, नंतर दिपोत्सव कार्यक्रम साजरा केला गेला. ‘ऑपरेशन मदत’ चे सन्माननीय सदस्य सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दुर्गसंवर्धनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना सर्पांविषयी सामान्य जनतेच्या मनातील अंधश्रद्धांचे खंडन करत उपस्थितांना योग्य माहिती देत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन केले.
विठ्ठल देसाई, सौरभ सांबरेकर, भाऊराव पाटील, केशव सांबरेकर, राजू तारीहाळकर, ज्ञानेश्वर पाटील, लखन यादव, ज्ञानेश्वर कदम व सुनील साखरे या कार्यकर्त्यांनी दुर्गसंवर्धनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली.
या कार्यक्रमाला जमेल तशी मदत करण्याबरोबरच कित्येक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटनांच्या पदाधिकार्यांनी सडा किल्ल्याच्या ठिकाणी भेट देऊन दुर्गसंवर्धनाचे काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे मनोबल उंचावले.