परदेशी पर्यटकांनी रात्री चक्क स्मशानात केला मुक्काम
भारतात पर्यटनासाठी आलेल्या दोन परदेशी पर्यटकांनी रात्री चक्क स्मशानात मुक्काम करून झोपल्याने खानापूर परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
खानापूर अनमोड -गोवा मार्गावरील रूमेवाडी गावातील चौगुले बंधूंच्या स्मशानात परदेशी पर्यटकांनी आपल्या दोन बुलेट दुचाकी स्मशानभूमीत लावून, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या जागेवरच दोन्ही बाजूला झोपाळा लावून झोपल्याचे पाहायला मिळाले.पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी कुतूहलाने स्मशानात जाऊन पाहिल्यावर दोन परदेशी पर्यटक झोपले असल्याचे पाहायला मिळाले.
खानापूर तालुक्यातील रूमेवाडी गावातील चौगुले बांधवांनी एकत्र येऊन रूमेवाडी-अनमोड रस्त्याच्या बाजूला आपल्या शेतीत सहा महिन्यापूर्वी स्मशानभूमीची निर्मिती करून त्या ठिकाणी एक शेड उभारले आहे.रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना हे शेड सहज दृष्टिस पडते.गोवा पाहायला येणारे परदेशी पर्यटक मोटारसायकल भाड्याने घेऊन आजूबाजूच्या परिसरात भ्रमंती करतात.हे पर्यटक रात्र झाली की सुरक्षित जागा बघून मुक्काम करतात.गोव्याहून निघालेल्या या दोन पर्यटकांना देखील स्मशानभूमीची जागा सुरक्षित वाटल्याने त्यांनी आपल्या बुलेट मोटारसायकल स्मशानात पार्क करून झोपाळा बांधून तेथेच निद्रा केली.पहाटे फिरायला आलेल्या लोकांनी परदेशी पर्यटक स्मशानात झोपलेले पाहिले पण त्यांनी देखील त्यांना डिस्टर्ब केले नाही.