“पुढील दोन वर्षे भाजपकडे केवळ आरोप-प्रत्यारोपांचीच राजनीति” – मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : “काँग्रेस सरकार कितीही जनहिताचे निर्णय घेत असले तरी भाजपकडून विरोध होणे ही त्यांची सवयच झाली आहे. पुढील दोन वर्षे भाजप नेत्यांकडे आरोप व विरोध करण्याशिवाय कोणतेही काम नाही,” अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भाजपवर टीका केली.
मंगळवारी शहरातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “हिरिरीने लढा देणाऱ्या लेखिका बानू मुश्ताक यांच्याकडून नाडहब्बा दसरा महोत्सवाचे उद्घाटन होणे ही अभिमानाची बाब आहे. सरकारने त्यांना निमंत्रण देऊन योग्य सन्मान दिला आहे. या घटनेत धर्म किंवा राजकारण ओढणे चुकीचे आहे,” असे ते म्हणाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, ही चांगली परंपरा आहे. नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. “बेळगावमध्ये दरवर्षीप्रमाणे उत्सव सुरळीत होईल. महापालिका, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, “कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्णत्वास आले आहे. डॉक्टरांची नियुक्ती लवकरच होणार असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन होईल,” अशी माहिती जारकीहोळी यांनी दिली.
धर्मस्थळ प्रकरणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “हायकोर्टाच्या आदेशानुसार एसआयटीची स्थापना करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रायतेहितासाठी डिसीसी बँक व हुकेरी वीज सहकारी सोसायटीच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडतील, यात राजकीय हेतू नाही, असेही त्यांनी नमूद केले. गोकाकमध्ये सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे सहा तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला केपीसीसीचे सरचिटणीस सुनील हणमन्नवर, बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, बसवराज सिग्गांवी, सिद्दीकी अंकलगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.