ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त
बेळगाव:
सातत्याने पडत असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त असल्याचे दिसत आहे.
गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. ढगाळ हवामानाचा जबर फटका रब्बी हंगाम पेरणी झालेल्या पिकांना बसण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी आलेल्या अनेक चक्रीवादळामुळे सुगी हंगाम देखील लांबला होता. त्यामुळे सर्वच कामे उशिरापर्यंत सुरू होती. वारंवार तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे मळणी तसेच रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुद्धा खूपच लांबली आहे.
त्याचबरोबर दररोज तयार होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्गांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या सततच्या ढगाळ हवामानामुळे पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील मसूर, वाटाणा, हरभरा , मोहरी आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव पडल्याचे दिसून येत आहे. खासकरून मसूर आणि वाटाणा पिकांवर त्याचा जास्त प्रभाव आहे. त्यामुळे या पिकांवर केलेला खर्च वाया जाणार काय ? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.