बुधवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे आणि शेतातील कापणीच्या प्रतीक्षेत असलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .पावसाने घात केला अशीच प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भातपीक वाळून गेले होते यावर्षी पाऊस जोरदार झाला आणि शेतकऱ्यांनी आर्थिक फटका सहन करून दुबार पेरणी केली होती.दुबार पेरणी नंतर भातपीक चांगले आल्यामुळे शेतकरी आनंदात होता.पण गेल्या आठ दिवसात झालेल्या परतीच्या पावसाने शेतातील उभी भातपीके आडवी झाली.नंतर कापणीला आलेली भातपीके शेतकऱ्यांनी कापायला सुरुवात केली.कापणी सुरू झाल्यावर ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याची धाकधूक वाढली होती.
कापलेले भात शेतात ठेवले होते.पण आज झालेल्या पावसाने शेतात पाणी साठून भात पिकाचे मोठे नुकसान झाले.बेळगाव परिसरात बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.या हजारो एकरातील बासमती भात पिकाचे आणि अन्य भात पिकाचे नुकसान झाले आहे.पाऊस जर पुन्हा आला तर शेतातील कापून ठेवलेल्या भात पिकाला कोंब फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.