मळणी, पेरणी कामामध्ये शेतकरी व्यस्त
बेळगाव:
बेळगाव तालुक्यातील समस्त शेतकरी वर्ग भात मळणी आणि रब्बी पिकांच्या पेरणी हंगामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
यावर्षी परतीचा पाऊस फारच लांबला आहे. त्यामुळेच मळणी तसेच रब्बी हंगामातील पेरणी हंगामही खूपच लांबला आहे. दरवर्षी रब्बी पिकांची पेरणी आणि भात मळणी डिसेंबर अखेरपर्यंत संपत आलेली असते. मात्र अजूनही भात मळणी आणि रब्बी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. त्यात भरीसभर म्हणजे ट्रॅक्टर आणि मजुरांची वेळेवर उपलब्धता होत नाही. तसेच मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अजूनही पावसाबद्दल भीती आहे.
रोज येणाऱ्या ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भीती देखील शेतकऱ्याला लागली आहे.
सध्या शिवारामध्ये मळणी आणि पेरणीची कामे जोरदार सुरू असल्यामुळे ट्रॅक्टर दिसू लागले आहेत. मजूर मिळत नसल्यामुळे मजुरांना जास्तीत जास्त पगार देऊन कामे करण्याचा कल शेतकरी वर्गाचा असल्याचे दिसत आहे. यावर्षी रब्बी पिकाच्या पेरणीचा हंगाम लांबल्यामुळे साहजिकच रब्बी पिकाच्या काढणीचा , मळणीचा हंगाम देखील लांबणार आहे. त्यामुळे एप्रिल , मे मध्ये होणाऱ्या वळीव पावसाची भीती देखील शेतकऱ्यांना आहे.