बेळगाव:
मागील काही दिवसांपासून बेळगाव आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण तयार होत आहे. हा अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आहे. दररोज ढगाळ वातावरण तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र धास्ती वाढली आहे. अजूनही काही ठिकाणची भात कापणी शिल्लक असून दररोजच्या ढगाळ वातावरणाला घाबरून मळणी कामे ठप्प झाली आहेत.
यावर्षी सुगीची कामे पाऊस लांबल्यामुळे पुढे ढकलली गेली आहेत. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे त्याचा सुगी कामावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी देखील लांबली आहे. पेरणी हंगाम लांबल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळले आहे.