हजारो एकर भात शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी पुन्हा चिंतित
बेळगावात पाचव्या दिवशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हजारो एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे .
बेळगाव तालुक्यात पावसाचा जोर कायम असून त्यामुळे आता शेतकरी पुन्हा चिंतित झाले आहेत.दमदार पावसामुळे बेळारी नाल्याला पूर आला आहे.बेळारी नाल्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले आहे.त्यामुळे हजारो एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे .
बासमती तांदळाचे पीक मुख्यत्वे करून या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.बेळगावच्या बासमती तांदळाला दरही चांगला मिळतो .दरवर्षी बेळारी नाल्याला पूर आला की शेतकऱ्यांना फटका बसत आहे.नाल्यातील गाळ काढून खोदाई करा अशी मागणी शेतकरी अनेक वर्षे करत आहेत पण त्याकडे सगळ्याच पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती.त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.अनेकांनी शेतातील विहिरीचे पाणी देऊन पीक जगवण्याचा प्रयत्न केला.पण नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतात पाणी मोठ्या प्रमाणावर पसरले आहे.