बेळगावात अंतर्जातीय विवाहानंतर पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांवर आरोप
बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील विजय गल्ली परिसरात एका ३ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत विवाहितेचे नाव अनिता निलेश नंद्यालकर असे असून, तिने फक्त चार महिन्यांपूर्वीच आपल्या ७ वर्षांपासूनच्या प्रेयसी निलेशशी लग्न केले होते.
लग्नानंतर दाम्पत्य भाड्याच्या घरात राहत होते. मात्र अंतर्जातीय विवाहामुळे पतीच्या कुटुंबीयांकडून सतत जातिविषयक वाद, मानसिक छळ सुरू असल्याचे मृत मुलीच्या नातेवाईकांचे आरोप आहेत. काल रात्री पतीच्या घरच्यांपैकी चौघेजण घरी आले होते, त्यानंतरच अनिताचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
घटनास्थळी ग्रामीण एसीपी शेखरप्पा व पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली असून, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दलित नेते प्रवीण मादर यांनी या घटनेवर संताप व्यक्त करताना, पतीने मारहाण करून अनिताला गळफास लावल्याचा आरोप केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अनिताच्या नातेवाईक जन्नाबाई यांनी सांगितले की, “अनिता प्रेमसंबंधात असल्याचे कळल्यावर आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने त्याच्याशीच लग्न केले. आता ती आमच्यात नाही आणि त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला रस्त्यावर आणले आहे,” असे त्यांनी भावनिक स्वरूपात सांगितले.