उद्योजक आप्पासाहेब गुरव यांची ६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड
बेळगाव (प्रतिनिधी) – आगामी ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात संपन्न होणार असून, या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सलग सहाव्यांदा उद्घाटक म्हणून ही जबाबदारी संपूर्णपणे संयोजकांनी त्यांच्यावर सोपवली आहे, यामुळे त्यांचा सन्मान अधिक वाढला आहे.https://dmedia24.com/ganesh-kale-elected-unopposed-as-belgaum-district-president-of-karnataka-state-samari-haralaya-sangh/
ही अधिकृत घोषणा साहित्य परिषदेचे राजाध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी केली. तसेच, संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. याशिवाय, डॉ. संजय कळमकर (दुसरे सत्र) आणि जागर लोकसंस्कृतीचे शाहीर अभिजीत कालेकर (तिसरे सत्र) यांचे व्याख्यान होणार आहे. हे संमेलन ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
आप्पासाहेब गुरव – एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व
आप्पासाहेब गुरव हे केवळ उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्ती नसून, समाजसेवा, शिक्षण, संस्कृती आणि राजकीय क्षेत्रातही ते सक्रिय योगदान देतात. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक असून, शैक्षणिक दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे कार्य त्यांनी सतत केले आहे.
ते मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून, पूर्वी त्यांनी सुभाषचंद्र नगर नागरी संघटनेचे अध्यक्षपद तसेच लायन्स क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिरे भरवून ६४ जणांच्या मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या.
तसेच, ते बेळगाव फॉउंड्री क्लस्टर, बेळगाव जिल्हा हॉकी संघटना, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि बेळगाव कोल अँड कोक असोसिएशनचे सदस्य आहेत. या विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी योगदान
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी आप्पासाहेब गुरव यांनी मोठे योगदान दिले आहे. बेळगाव शहरात पहिल्यांदाच जिजाऊ जयंती साजरी करण्याचा संकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. तसेच, चंदगड-कोवाड भागातील पुरग्रस्तांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत पुरवली आहे.
विशेष म्हणजे, मराठी भाषेला दर्जा मिळाल्याने त्यांनी मराठी संस्कृती विषयक विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांची भूमिका अधिक ठळक झाली आहे.
ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावान कार्यकर्ते असून, सीमाभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारे एक परिपूर्ण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
साहित्य संमेलनाच्या यशासाठी महत्त्वपूर्ण योगदान
आप्पासाहेब गुरव हे साहित्य संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संमेलन यशस्वी करण्यासाठी ते अथक परिश्रम घेत असून, त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे हे संमेलन अधिक भव्य आणि दर्जेदार होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
त्यांच्या या निवडीमुळे मराठी साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेला नवीन उंची मिळेल. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शब्दांकन:
रवी पाटील