बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील बुड्रकट्टी येथे वृद्ध शेतकऱ्याचा विळ्याने हल्ला करून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. चेष्टेतून व क्षुल्लक कारणातून हा खून घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
रुद्राप्पा शिवबसाप्पा पागद (वय ६४, रा. बुड्रकट्टी, ता. बैलहोंगल) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी त्याच गावातील मल्लाप्पा शिवशंकर यरगोप्प (वय ४२) याला दोडवाड पोलिसांनी अटक केली.
रुद्राप्पा शेताकडे काम असल्याने भाकरीचे गाठोडे व विळा घेऊन शेताकडे निघाले होते. दुसऱ्या एका साथीदाराला सोबत घेण्यासाठी ते जुन्या पंचायतीच्या पायरीवर गाठोडे व विळा ठेवून बसले होते. यावेळी मल्लाप्पा हा येथे आला व त्याने अचानक जेवणाचे गाठोडे व विळा घेऊन जाऊ लागला. त्याने बहुदा हे गंमतीने केले असावे. यानंतर वृद्ध शेतकऱ्याने पुढे जाऊन विळा व शिदोरी आपली आहे, ती परत दे असे सांगितले. यातून दोघांमध्ये भांडण जुंपले. यातूनच मल्लाप्पाने हातातील विळ्याने वृद्धावर हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून मल्लाप्पावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. बैलहोंगलचे उपअधीक्षक रवी नायक, कित्तूरचे निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोडवाड पोलिसांत नोंद झाली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक सुमा गोरबाळ तपास करत आहेत.