बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाप्रश्नाबाबत माहिती द्यावी आणि मराठी भाषकांवरील अन्याय दूर व्हावा तसेच सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बेळगाव व खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे.
खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांच्यासह बेळगाव येथील समितीच्या कार्यकर्त्यांनी गोवा येथे नुकतीच केंद्रीय मंत्री नाईक यांची भेट घेतली. यावेळी आबासाहेब दळवी यांनी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
त्यामुळे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधानांना माहिती द्यावी आणि प्रश्न लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. तसेच संमेलनाला बेळगाव सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यावेळी उमेश पाटील, सुहास हुद्दार, किरण हुद्दार, शेखर तलवार आदी उपस्थित होते.