खानापूर तालुक्यात दुहेरी मृत्यू: प्रेमसंबंधातून भीषण हत्याकांड
बेळगाव | खानापूर तालुका | बीडी गाव — खानापूर तालुक्यातील बीडी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दोन वर्षांपासून चालू असलेल्या प्रेमसंबंधातून एका विवाहित तरुणाने विवाहित प्रेयसीवर सलग चाकूचे वार करून तिचा खूण केला आणि त्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्या केली.
मृत महिला रेश्मा तिरवीर (वय 29) हिला दोन मुले असून ती विवाहित आहे. आरोपी आनंद सुतारलाही तीन मुले असून पत्नी सध्या गर्भवती आहे. काही दिवसांपूर्वी या संबंधाची माहिती रेश्माच्या पतीला मिळाल्याने घरात वाद झाले होते. रेश्माच्या पतीने नंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला इशारा देऊन सोडून दिले होते.
मात्र, गुरुवारी रात्री आनंद सुतार रेश्माच्या घरी पोहोचला आणि सलग नऊ वार करत तिचा मृत्यू घडवून आणला. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार केला. गंभीर अवस्थेत बेळगाव रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) वीरेश हिरेमठ यांनी पाहणी केली. नंदगड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.