सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, खानापूर व बेळगावसह राज्यातील डोंगराळ भागात शाळकरी मुले व ग्रामस्थांना पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी छोटे पूल बांधण्याची सोय व्हावी यासाठी विशेष प्रकल्पाचा विचार करण्यात येत आहे. तसेच खानापूर तालुक्यात पूल बांधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, सध्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना मार्गदर्शक सूचनांनुसार भरपाई देण्यात येत आहे.
पूर्णत: कोसळलेल्या घरांच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी कारवाई केली जाईल. नोव्हेंबरनंतर रस्ता बांधकामाचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.