श्री दुर्गामाता दौडीत सहभागी होताना पाळावयाची शिस्त आणि नियम :
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्र उत्सवात दौडीचे आयोजन करण्यात येते. बेळगाव मध्ये ही दुर्गा माता दौड सुरुवात होऊन 25 वर्षे झाली.अत्यंत भक्तीभावाने,नियोजनबद्ध शिस्ततेत होणार्या श्री दुर्गा माता दौडीची आतुरतेने प्रत्येक कुटुंब शिवभक्त वाट पाहत असतात. अवघ्या 23 कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सुरुवात झालेली श्री दुर्गा माता दौड आज 25000 ते 40000च्या वर उपस्थितीमध्ये पोहोचली आहे. शहरातील प्रत्येक भागातून या दौडीचे आयोजन होते. अनेक ठिकाणी महिलावर्ग, अनेक मंडळे, नागरीक, कार्यकर्ते उस्फूर्तपणे या श्रीदुर्गामाता दौडीचे स्वागत करतात.
यावर्षीही श्री दुर्गा माता दौड नियोजनबद्ध होणार आहे.
श्री दुर्गामाता दौडीत सहभागी होताना पाळावयाची शिस्त आणि नियम :
१) ठरलेल्या वेळी ठरल्या ठिकाणी दौडीच्या सुरुवातीपासूनच दौडीत सामील व्हावयाचे आहे.
२) दौडीची सुरुवात प्रेरणामंत्र व आरतीने होईल.
३) दौडीच्या प्रारंभी भगवा ध्वज असेल, त्यानंतर शस्त्र पथक, ध्वजरक्षक पथक, त्यानंतर ज्या भागात दौड आहे त्या भागातील भगवे फेटेदारी व त्यानंतर संपूर्ण समाज असेल.
४) दौडीमध्ये सहभागी होत असताना प्रत्येक शिवभक्ताने डोक्यावर पांढरी भारतीय टोपी अथवा भगवा फेटा परिधान करावा.
५) स्वागताच्या वेळी रांगोळ्यांमध्ये ओम,स्वस्तिक अथवा हिंदू देवी देवतांचे चित्र काढू नये. कारण दौडीमध्ये पळत असताना ते पायाखाली तुडवले जातात. त्याची विटंबना होऊ नये म्हणून.
६) इतर संघटना/संस्था/मंडळे यांची टी शर्टस घालू नये(श्री दुर्गामाता दौड हा आपसी भेद वाढविणारा नाही तर भेद मिटविणारा उपक्रम आहे.)
७) दौडीत सामाजिक आणि राष्ट्रीय संदेश देणारी गीते/गुरुजी लिखित श्लोक (राष्ट्रभक्ती धारा) खड्या आवाजात म्हणावयाचे आहे.
८)ठरलेले पवित्र उदघोष/घोषणाच द्याव्यात, अवांतर/असंबंध घोषणाबाजी अजिबात चालणार नाही.
९) शिस्त हा आपल्या कार्याचा प्राण आहे त्यामुळे समाजाभिमुख होताना ती काटेकोरपणे पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. स्वतः शिस्त पाळून इतरांना ती पाळावयास लावणे आणि उपरोक्त नियमांचं उल्लंघन होण्यास मज्जाव करणे हे दौडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे काम आहे.
१०)चंगळवाद/टोळकेपणा/हुल्लडबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नाही.
११) आदरणीय भिडे गुरुजी यांनी आपल्याला श्री दुर्गामाता दौड हा उपक्रम प्रत्येक हिंदू मनात शिवाजी-संभाजी बीज मंत्र भिनावा, तसेच या भारत मातेचा संसार दुरुस्त करण्यासाठी आपण या नवरात्र उत्सवात प्रत्येक देवी देवता पुढे जोगवा मागण्यासाठी जात असतो. त्यामधून आपल्याला ती ऊर्जा, ती ताकद, ती शक्ती मिळावी यासाठी आपण प्रत्येक मंदिरात जाऊन मागणं मागत असतो. या विचारांनी प्रत्येक धारकऱ्यांनी, शिवभक्तांनी स्वयंस्फूर्त या दौडीमध्ये सहभागी व्हावे.
१२)आपले वरिष्ठ/प्रमुख धारकरी ज्याप्रमाणे मार्गदशन करतील तसे करण्यास कोणत्याही प्रकारचा संकोच असता कामा नये.