धनश्री उत्तम शिंदे यांना कर्नाटक सरकारचा एनएसएस राज्य पुरस्कार
बंगळुरू : राष्ट्रीय सेवा योजनेतील उल्लेखनीय कार्यासाठी गोगटे वाणिज्य महाविद्यालय, टिळकवाडी, बेलगाव आणि राणी चन्नम्मा विद्यापीठ बेलगावच्या स्वयंसेविका धनश्री उत्तम शिंदे यांना कर्नाटक सरकारचा राज्यस्तरीय सर्वोत्तम एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २०२२-२३ या वर्षासाठी दिला गेला असून, त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांची राज्यातील सर्वोत्तम महिला स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या युवा सशक्तीकरण आणि क्रीडा विभागाने हा पुरस्कार दिला.
धनश्री यांना कर्नाटकचे माननीय राज्यपाल श्री. थावरचंद गहलोत आणि कर्नाटक राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. के. गोविंदराजू यांच्या हस्ते १७ मार्च २०२५ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेलगाव येथील हॉकीपटू आणि रिटायर्ड ऑनरी कॅप्टन श्री. उत्तम शिंदे यांची त्या कन्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.