मेलबर्न:
येथील एमसीजी ग्राउंड वर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटी मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 184 धावांनी पराभव केला. थर्ड अंपायर शरफूदूला साकत यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा भारताच्या टीमला तोटा सहन करावा लागला. यशस्वी जयस्वाल ला मैदानी पंचानी नाबाद ठरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने व्यवस्थित तपासणी न करता चुकीचा निर्णय दिला आणि जयस्वाल ला बाद ठरविले. त्याचबरोबर थर्ड अंपायरने आकाशदीप याला देखील बाद नसताना पायचीत बाद चा निर्णय दिला. त्यामुळे मैदानात उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमींनी पंचांच्या या निर्णयाला चीटर चीटर असे म्हणून त्यांची हुर्या उडवली.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी भारताला हा कसोटी सामना जिंकणे अत्यंत गरजेचे होते. मात्र हा सामना भारताने गमावल्यामुळे त्यांचे आता अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचे स्वप्न हे स्वप्न राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर या मालिकेमध्ये दोन विरोध एक अशी आघाडी घेतली आहे.
या कसोटी मध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावामध्ये 474 धावांचा डोंगर उभारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भारताचा डाव घसरला होता. अशावेळी नितीश कुमार रेड्डी आणि वाशिंग्टन सुंदर यांनी चांगली फलंदाजी करून भारताच्या डावाला आकार दिला. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने कसोटी मधील वैयक्तिक पहिले शतक केले. भारताच्या पहिल्या डावांमध्ये नितीश कुमार रेड्डीने वैयक्तिक सर्वोच्च 114 धावांची खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदर ने अर्धशतक करून चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने पहिल्या डावांमध्ये 369 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावांमध्ये 105 धावांची भक्कम आघाडी मिळवली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावांमध्ये 234 धावा केल्या. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी भारताला 340 धावांचे उद्दिष्ट मिळाले.
340 धावांचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. यावेळी कर्णधार रोहित शर्मा सपशेल फेल गेला. त्याने फक्त नऊ धावा केल्या. त्यापाठोपाठ विराट कोहली आणि राहुल हे दोघेही स्वस्तात बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था एक वेळ तीन बाद 33 अशी केविलवाणी झाली होती. अशा अवघड परिस्थितीमध्ये यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डाव सावरला. त्यांनी भारताकडून चौथ्या गड्यासाठी 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे भारताची धावसंख्या कशीबशी 155 पर्यंत पोहोचली. तरीदेखील ते भारताचा पराभव वाचवू शकले नाहीत. भारताने दुसऱ्या डावात केलेल्या 155 धावांमध्ये यशस्वी जयस्वाल याच्या 84 धावा आहेत. यावरून भारतीय फलंदाजांचा दर्जा लक्षात येतो. ऋषभ पंत यानेच 30 धावा केल्या. तर उर्वरित फलंदाजानी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. पहिल्या डावामध्ये शतक केलेला नितीश कुमार रेड्डी दुसऱ्या डावामध्ये फक्त एक धाव करून तंबूत परतला. वाशिंग्टन पाच धावांवर नाबाद राहिला.ऑस्ट्रेलिया कडून कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. लिऑनने दोन आणि मिचल स्टार्क आणि ट्रॅव्हीस हेड यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाने 234 धावा केल्या होत्या. यामध्ये मारनेस लाबूशेन याने सर्वाधिक 70, कमिन्स आणि लिऑन यांनी प्रत्येकी 41 धावांचे योगदान दिले. दहाव्या विकेटसाठी स्कॉट बोलंड आणि लिऑन यांनी 51 धावांची भागीदारी केली. भारताला ही भागीदारी खूपच महागात पडली. कमिन्स याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.