बेळगावसह कर्नाटकातील विविध कारागृहांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या एकूण ५५ कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावातील हिंडलगा कारागृहातील ९ कैद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरीनंतर कैद्यांना सोडले जाणार आहे. विविध आरोपांमुळे शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांची चांगली वर्तणूक विचारात घेऊन त्यांना शिक्षेतून मुक्त करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्या आधारे कैद्यांना सोडले जाते.
याआधी १० जुलै रोजी ७७ कैद्यांना सोडण्यात आले होते. आतापर्यंत वर्षातून दोनवेळा कैद्यांना सोडण्यात येत होते.पण काही दिवसांपूर्वी सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार वर्षातून तीनवेळा कैद्यांना सोडले जाते. गेल्या २०१५ पासून आतापर्यंत २२२१ कैद्यांना सोडण्यात आले आहे. आता ५५ कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चांगल्या वर्तणुकीच्या आधारे सोडण्यासाठी मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक, जिल्हा पोलिसप्रमुख यांचा समावेश असणारी समिती सरकारकडे शिफारस करते. मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी निर्णय घेतला जातो. तेथून केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्यपालांकडे शिफारस केली जाते. गंभीर गुन्ह्यातील कैदी असेल तर त्यावर राज्यपाल किंवा केंद्रीय गृह मंत्रालय आक्षेप घेऊ शकते. संबंधित कैद्याला वगळून इतरांना सोडता येते.