*बेळगाव, १८ मार्च २०२५:* कर्नाटक दलित संघर्ष समिती (आंबेडकरवाद) बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने २० मार्च २०२५ रोजी ‘शोषितांचा संघर्ष दिन’ साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, बेळगाव येथे सकाळी होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन १९२७ च्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ केले जाणार आहे.
समितीचे राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे यांनी मंगळवारी हॉटेल मिलन येथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, २० मार्च १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी महाड (रायगड जिल्हा) येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यतेविरोधी पहिली लढत उभारली होती. या ऐतिहासिक संघर्षाच्या ९८ व्या वर्धापनदिनानिमित्त हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमात नागरिक हक्क अंमलबजावणी संचलनालय, बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र गडादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भीमपुत्र बी. संतोष आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे निवृत्त प्राध्यापक श्रीकांत हे उपस्थित राहणार आहेत. सिद्धाप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेला जिल्ह्याभरातील सर्व तालुक्यांमधील सुमारे १,००० कार्यकर्ते हजर राहतील, असे समितीने नमूद केले.
पत्रकार परिषदेत दलित संघर्ष समिती (आंबेडकर वाद)चे जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार, दलित नेते मल्लेश चौगुले, नागेश कामशेट्टी, संतोष तळवार, सागर कोलकर, दीपक धबाडे, लक्ष्मण कांबळे, भैरू मेत्री, निंगाप्पा कांबळे,रामा चव्हाण,जीवन कुरणे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
*ऐतिहासिक पार्श्वभूमी:**इन्फंट्री चषकावर मिहीर पोतदारचा दमदार विजय*
१९२७ च्या महाड सत्याग्रहादरम्यान, दलितांना सार्वजनिक जलस्रोत वापरण्यास मनाई होती. डॉ. आंबेडकरांनी या अन्यायाविरुद्ध चवदार तळ्याचे पाणी पिऊन सामाजिक विषमतेला आव्हान दिले होते. हा संघर्ष दलित हक्क चळवळीचा पाया ठरला. या वर्षीच्या कार्यक्रमातून त्या ऐतिहासिक संघर्षाचे महत्त्व पुन्हा एकदा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.