बेळगाव : जीएसएस पीयू कॉलेजच्या बहुभाषा विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्राचार्य एस. एन. देसाई, उपप्राचार्य सचिन पवार, विभाग प्रमुख प्रा. उमा भोजे यांच्यासह प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी वर्गाच्या स्वागतगीताने झाली. विद्यार्थिनी रेवतीने हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर विद्यार्थ्यांनी संस्कृतीक कार्यक्रम सादर केले. यात संपदाने मीराबाईचे भजन गायले, नम्रता आणि पूर्वी यांनी पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनचरित्रावर नाटक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. रानी व अर्पिताने कबीर दोहे व कृष्णगीत सादर केले.
विद्यार्थिनी प्रज्ञाने ‘पाणी – शांत व रौद्र रूप’ या विषयावर प्रभावी विचार मांडले. तनीष्काने स्वतः रचलेली कविता सादर केली, तर नम्रताने तेनालीरामाच्या जीवनातील बोधकथा रसिकांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. आभार प्रदर्शन हर्षने मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.