कर्नाटकच्या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार सी.टी.रवी यांची मोठ्या पोलीस बंदोबस्तात बंगलोरला रवानगी करण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी अटक केल्या नंतर रवी यांना खानापूर पोलीस स्थानकात नेण्यात आले पण तेथे भाजप समर्थक मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात रात्रभर फिरवले.
अखेर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने न्यायालय आवारात जमले होते.न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी दुपार नंतर करणार असल्याचे सांगितले.अखेर सायंकाळी आमदार सी.टी.रवी यांच्या विरुद्धचा दावा बंगलोर येथील लोकप्रतिनिधी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला.नंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात रवी यांना बंगलोरला हलविण्यात आले.