बेळगावात गणेशोत्सवात महिलांची पाककला स्पर्धा रंगतदार — ७२ स्पर्धकांचा सहभाग
बेळगाव प्रतिनिधी :
श्री भक्ती महिला सोसायटी, श्री राजमाता महिला सोसायटी, श्री माता सोसायटी व ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेशोत्सवात दुसऱ्या दिवशी गणेश पूजन व आरती करून कार्यक्रमांचा शुभारंभ झाला. यावेळी श्री राजमाता महिला सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. प्रतिभा नेगीनहाळ, श्री भक्ती महिला सोसायटीच्या सौ. रूपाली जनाज, श्री माता सोसायटीच्या संचालिका डॉ. सौ. मीना पाटील व ज्ञानमंदिर स्कूलच्या प्राचार्या सौ. अश्विनी चंद्रशेखर यांच्या हस्ते पूजन व उद्घाटन पार पडले.
या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरली ती वरईच्या तांदळापासून बनवलेल्या गोड व तिखट पदार्थांची पाककला स्पर्धा. या स्पर्धेत तब्बल ७२ महिला स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन सौ. रूपाली जनाज यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. प्रतिभा नेगीनहाळ यांनी व्यक्त केले.
परीक्षक म्हणून प्रियंका कलघटगी व धनश्री हलगेकर यांनी परीक्षण केले. गोड पदार्थांमध्ये तेजश्री पवार यांनी प्रथम, अनिशा मांगले यांनी द्वितीय व नमिता पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर तिखट पदार्थांमध्ये अनिशा मांगले प्रथम, शोभा महिंद्रकर द्वितीय व वृषाली पाटील तृतीय क्रमांकावर ठरल्या. विशेष म्हणजे, गोड व तिखट या दोन्ही प्रकारात उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री भक्ती महिला सोसायटी व श्री राजमाता महिला सोसायटीच्या सदस्य व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.