बेळगाव :शहरातील नामांकित व्यावसायिक संतोष पद्मन्नवर (वय ४८, रा.महांतेशनगर – संतोष पद्मन्नवर अंजनेयनगर, सेक्टर क्रमांक १२) यांचा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाल्याची तक्रार त्यांच्या मुलीने मंगळवारी माळमारुती पोलिसांत दिली. त्यानुसार मृताच्या पत्नीसह तिघांविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे. रात्री उशिरापर्यंत याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष पद्मन्नवर हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत महांतेशनगर, अंजनेयनगर परिसरात राहात होते. त्यांना पत्नी व तीन मुले असून मोठी मुलगी बंगळूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. उर्वरित दोन्ही मुले १३ व १५ वर्षांची आहेत. ९ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. नैसर्गिक मृत्यू झाल्याचे जाहीर करून त्यांच्यावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या दफनविधीचे सोपस्कार पार पडले.
मुलीची ६ दिवसांनी तक्रार
हे सर्व घडल्यानंतर सहा दिवसांनी मंगळवारी अचानक मृताच्या १९ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाल्याचे सांगत माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा मुलीची फिर्याद नोंदवून घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
मृतदेह उकरून काढणार
या प्रकरणाची नोंद करून घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्याकडून सुरू आहे. नैसर्गिक मृत्यू आता अनैसर्गिक मृत्यूत परावर्तीत झाल्याने त्यानुसार याची नोंद करून घेतली आहे. पुढील तपासासाठी बुधवारी हा मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढून वडिलांचा खून झाल्याची तक्रार तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. शिवाय काही नमुने तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जातील. यामध्ये जे स्पष्ट होईल, त्यावर पुढील कारवाई ठरणार आहे. परंतु, खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी मृताची पत्नी व अन्य दोघांची पोलिस ठाण्यात आणून चौकशी केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.