जिल्हाधिकाऱ्यांनी केली नद्यांच्या पात्रांची पाहणी
बेळगाव ,खानापूर आणि कित्तूर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू असून रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता.संततधार पाऊस बेळगाव ,खानापूर आणि कित्तूर तालुक्यात सुरू असल्याने या तीन तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार दि.२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.पावसाचे प्रमाण वाढल्याने आणि अनेक भागात पाणी साठल्याने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुट्टीचा आदेश बजावला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी नितेश पाटील,जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोईर ,जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.संजीव पाटील यांनी अनेक ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.मांजरी येथे कृष्णा नदीची पाहणी करण्यात आली असून सध्या तरी पुराचा धोका नसून खबरदारीचा उपाय म्हणून आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे .
वेदगंगा आणि दूधगंगा नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.पूरस्थिती उद्भवल्यास नदीकाठच्या गावातील जनता आणि जनावरे यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी देखील तयारी करण्यात आली आहे. पूरस्थिती उदभवल्यास त्याला तोंड देण्यासाठी बोटीही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
धबधबे आणि पर्यटन स्थळाकडे जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.पाणी वाहत असलेल्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पोलीस देखील तेथे तैनात करण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी बारवाड ,कुन्नुर आणि भोज गावांना देखील भेट देऊन पाहणी केली.