सीमावादावर शांतता प्रस्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी – खासदार धैर्यशील माने यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : कर्नाटक–महाराष्ट्र सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने त्यांची पुन्हा एकदा कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी हे पत्र पाठवले. सध्या बेळगावसह सीमाभागात कन्नड सक्ती सुरू असून, मराठी भाषिकांवर भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 21 वर्षांपासून हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून सुनावणीच्या तारखा लांबत आहेत. त्यामुळे आसाम–मेघालयप्रमाणे हा वाद न्यायालयाबाहेर सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी नमूद केले.
चार वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती आणि समन्वय मंत्र्यांची नियुक्तीही केली होती, मात्र त्यांची बैठक एकदाही झाली नाही. त्यामुळे पुन्हा बैठक बोलवून संवाद सुरू करण्याची गरज असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, 28 जुलै रोजी पाठवलेले हे पत्र 11 ऑगस्ट रोजी बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला पोलिसांनी नकार दिल्यानंतर विशेष महत्त्वाचे ठरले आहे.