जातीनिहाय जनगणना : मराठा समाज नेत्यांकडून जनजागृती
बेळगाव : राज्यात 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेसंदर्भात मराठा समाजामध्ये व्यापक जनजागृती सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज बेळगावातील नवहिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि मराठा सहकारी बँकेला भेट देऊन पदाधिकारी व संचालक मंडळाला मार्गदर्शन केले.
मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी संचालकांसह माहिती घेतली आणि सभासद, ग्राहक तसेच हितचिंतकांना आवाहन केले की, “जनगणना पत्रक भरताना धर्म – हिंदू, जात – मराठा, पोटजात – कुणबी आणि भाषा – मराठी असे स्पष्टपणे नमूद करावे.”
बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर यांनीही नागरिकांना विनंती केली की, अधिकारी आले की मराठा समाजातील नेत्यांच्या सूचनेनुसार माहिती नमूद करावी.
नवहिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनीही समान भूमिका मांडली. ते म्हणाले की, “धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी असा ठोस उल्लेख होणे गरजेचे आहे. यामुळे पुढील पिढ्यांना शासकीय लाभ मिळविण्यासाठी आधार तयार होईल.”
किरण जाधव हे सध्या शहरातील विविध संस्था, संघटना व सहकारी संस्थांना भेट देत असून, तेथील पदाधिकारी आणि संचालक मंडळाला जनगणना प्रक्रियेत योग्य माहिती नोंदवण्याचे मार्गदर्शन करत आहेत.