बेळगाव : शहरातील एका महिलेला ब्लॅकमेल करून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात भाजप नेते पृथ्वी सिंह आणि त्यांचा मुलगा जसवीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सदर महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल झालेल्या महिलेने आता या प्रकरणाला कलाटणी देत भाजप नेते पृथ्वी सिंह आणि त्यांचा मुलगा जसवीर सिंग यांच्यावर आरोप केला आहे.
पृथ्वी सिंह आणि त्यांचा मुलगा हे दोघेही मला नजरकैदेत ठेवून माझा मानसिक आणि लैंगिक छळ करून माझा नवरा आणि सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यासाठीच त्यांनी मला जबरदस्तीने विष पाजले. अशा प्रकारची तक्रार खडे बाजार पोलिस ठाण्यात पीडित महिलेने केली आहे.