कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन उत्साहात
कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.मदन बामणे, मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री.शिवाजी अतिवाडकर,कार्याध्यक्ष श्री. मधु बेळगावकर,तालुका विविध कार्यकारी संघाचे सल्लागार व निवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रकाश बेळगुंदकर,शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे, शाळेचा शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली.त्यानंतर दीपप्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे पुष्प व सन्मान चिन्ह देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात ‘लाभले आम्हास भाग्य,बोलतो मराठी’ हे गीत सादर केले.
यानंतर श्रेया गावडे व कृष्णवेणी महागावकर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले,त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा आपले विचार मांडले.श्री शिवाजी अतिवाडकर यांनी आज मराठी भाषा व संस्कृती टिकवणे ही काळाची गरज असून मराठी शाळांना प्रोत्साहन देणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे एक मराठी प्रेमी म्हणून शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे विचार त्यांनी मांडले.त्याचबरोबर श्री. प्रकाश बेळगुंदकर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत शाळेत चालणारे विविध उपक्रम,शाळेची शैक्षणिक प्रगती यांची पाहणी करत शाळेबद्धल गौरोवोउद्गार काढून मराठी भाषा ही समजण्यास सोपी व आपल्या बुद्धीचा विकास करणारी भाषा आहे.त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणाला खूप महत्त्व असून आज अनेक विद्यार्थी उच्च पदावर गेले, त्यातील जास्तीत जास्त अधिकारी हे मातृभाषेतून शिक्षण घेऊन पुढे आलेले आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठेही कमीपणा न घेता आपल्या मातृभाषेतून ज्ञान घेऊन उच्च ध्येय गाठावे व विविध पुस्तकांचे वाचन करण्यावर भर द्यावा असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
यावेळी श्री.मदन बामणे, मधू बेळगावकर यांनी सुद्धा आपले विचार मांडले व शाळेची शिस्त,स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शाळेविषयी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आज्ञा जुवेकर, सई पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सायली बेळगावकर या विद्यार्थिनींनी केले.यावेळी शाळेचे शिक्षक उदय पाटील,धनाजी कुरणे,नीता गुंजीकर,श्रीकांत काटकर,मनीषा वड्डगोळ, तुषार कांबळे,राहुल कांबळे,राजश्री बागडी,संगीत शिक्षिका रेणुका सरमळकर व विद्यार्थी उपस्थित होते.